एटापल्लीत संतापाचा उद्रेक!‘JSW’ कंपनीविरोधात नक्षल बॅनर; “चले जाओ”च्या घोषणांनी परिसर दणाणला
एटापल्लीत संतापाचा उद्रेक!‘JSW’ कंपनीविरोधात नक्षल बॅनर; “चले जाओ”च्या घोषणांनी परिसर दणाणला
शशांक नामेवार तालुका प्रतिनिधि
एटापल्ली ,
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात खाणकामाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील वटेली परिसरात लोहखनिज उत्खननाचे काम सुरू करण्यासाठी हालचाली करणाऱ्या JSW कंपनीविरोधात नक्षल समर्थक बॅनर झळकल्याने खळबळ उडाली आहे. “JSW चले जाओ” अशा आशयाचे बॅनर परिसरात दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
*मुख्यमंत्री राज्यात नक्षलमुक्तीबाबत भाष्य करत असताना दुसरीकडे एटापल्ली परिसरात नक्षल बॅनर* दिसून येत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. बॅनरमधून कंपनीच्या कामांना तीव्र विरोध दर्शवण्यात आला असून, कंपनीची यंत्रसामग्री आणि वाहने उध्वस्त करण्याच्या धमक्यांचाही उल्लेख असल्याची चर्चा आहे.
ग्रामसभांना डावलल्याचा आरोप
स्थानिक ग्रामस्थांच्या मते, पेसा (PESA) कायद्यानुसार ग्रामसभेची संमती आवश्यक असताना संबंधित प्रक्रिया पूर्ण न करता काम सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. “आमच्या जमिनी, जंगल आणि संसाधनांवर आमचा हक्क आहे. ग्रामसभेच्या परवानगीशिवाय कोणालाही काम करू देणार नाही,” अशी भूमिका काही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
राजकीय पाठबळाच्या चर्चांना उधाण
या प्रकरणाला आता राजकीय रंगही चढू लागला आहे. काही स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मदतीनेच कंपनीने काम पुढे नेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. जनभावना आणि ग्रामसभांचा विरोध डावलून प्रशासन आणि कंपनीने पुढाकार घेतल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण असून प्रशासन यावर कोणती भूमिका घेणार, तसेच संबंधित कंपनी आणि राजकीय पदाधिकारी काय स्पष्टीकरण देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment