जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास कडक कारवाई – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास कडक कारवाई – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
गडचिरोली,
गडचिरोली जिल्ह्यात घरगुती एल.पी.जी. गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. मात्र आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा किंवा इतर कोणत्याही कारणाचा आधार घेत कृत्रिम तुटवडा असल्याचे भासवणे, अफवा पसरवणे किंवा सिलेंडरचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांच्या वितरकांची आढावा बैठक घेण्यात आला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. गोकुल, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे तसेच हिंदुस्तान पेट्रोलियमचे जिल्हा मुख्य वितरक आकाश गौर यांच्यासह संबंधित वितरक उपस्थित होते.
बैठकीत वितरकांकडून जिल्ह्यात एल.पी.जी. गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली. सध्या व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलेंडरवर काही निर्बंध लागू करण्यात आले असल्याचे त्यांचेकडून सांगण्यात आले. मात्र शैक्षणिक संस्था, आश्रमशाळा, रुग्णालये आदी आवश्यक सेवांसाठी प्राधाण्याने सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
सर्व गॅस वितरकांनी आपल्या संबंधित कंपनीशी समन्वय ठेवून गॅस पुरवठा सुरळीत ठेवावा, तसेच कोणत्याही चुकीच्या संदेशांमुळे किंवा अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केले. नागरिकांनी देखील अनावश्यक घाबरून जाण्याचे किंवा साठेबाजी करण्याचे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीदरम्यान संबंधित कंपन्यांनी दररोजचा उपलब्ध गॅस साठा जिल्हा पुरवठा कार्यालयास कळवावा तसेच नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी गॅस एजन्सींनी आपल्या कार्यालयाच्या दर्शनी भागात टोल-फ्री क्रमांकासह माहिती फलक लावावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. सोबतच नागरिकांनी त्यांच्या अडचणी व तक्रारी शासनाकडे मांडण्यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयच्या 07132-222007 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले.
000

Comments

Popular posts from this blog

गडचिरोली शहरातील कचरा व्यवस्थापना ,जाळण्याचा प्रकार सुरूचनगरसेवक देशमुखांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

पंचशील बुद्ध विहार, रामनगर, गडचिरोली येथे पाण्याची सोय; नगरसेवक श्रीकांत देशमुख यांचा स्वखर्चातून बोअरवेल करून देण्यासाठी पुढाकार..