आलापल्ली-सिरोंचा महामार्ग बनला वाहनचालकांसाठी यमदूत...आलापल्ली-सिरोंचा महामार्गावरील अवजड वाहतूक तात्काळ बंद करा: संतोष ताटीकोंडावार
गडचिरोली,
एकीकडे विकासाच्या गप्पा मारल्या जात आहेत, तर दुसरीकडे आलापल्ली-सिरोंचा हा मुख्य मार्ग (153C) मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्ता बांधकामाच्या नावाखाली सुरू असलेल्या अनागोंदी कारभारामुळे आणि अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आज या रस्त्याची पुरती वाताहत झाली आहे. विशेष म्हणजे, रस्त्याच्या मधोमध झिमेला ब्रिज जवळ महाकाय खड्डा पडल्यामुळे गेल्या चार तासांपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, प्रवाशांचे हाल होत आहेत.तसेच जागोजागी रस्त्यावर माती आल्याने चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे.
प्रशासनाचा 'पाझर' फुटणार तरी कधी?
सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी या बिकट परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. वारंवार आंदोलने करून आणि प्रशासनाला निवेदने देऊनही रस्ते विकास महामंडळ आणि संबंधित ठेकेदाराच्या कानपूरही हलत नाहीये, ही दुर्दैवाची बाब आहे. "एसीमध्ये बसून कारभार हाकणाऱ्या अधिकाऱ्यांनी एकदा या रस्त्यावरून प्रवास करून दाखवावा, म्हणजे त्यांना जनसामान्यांच्या वेदना समजतील," असा जळजळीत सवाल ताटीकोंडावार यांनी उपस्थित केला आहे.
या रस्त्यावरील झिमेला ब्रिज जवळ पडलेला हा खड्डा इतका खोल आहे की, एखादे वाहन त्यात कोसळल्यास भीषण अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या मार्गावरून धावणारी वाहने जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.
**जिल्हाधिकाऱ्यांचा दिलासा, पण कृतीची प्रतीक्षा**
संतोष ताटीकोंडावार यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून या रस्त्यावरील जीवघेणी अवजड वाहतूक तातडीने बंद करण्याची विनंती केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपाययोजनांचे आश्वासन दिले आहे. मात्र, प्रशासनाच्या आश्वासनाची अंमलबजावणी होऊन रस्ता कधी दुरुस्त होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. जोपर्यंत रस्ता पूर्ववत होत नाही, तोपर्यंत प्रवाशांना जीवघेण्या प्रवासाचा सामना करावा लागणार आहे.
Comments
Post a Comment