गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नगराध्यक्ष दाम्पत्याचा प्रेरणादायी संकल्प..मानधनासह आर्थिक मदत करण्याचा मानस..

गरजू  विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नगराध्यक्ष दाम्पत्याचा प्रेरणादायी संकल्प..मानधनासह आर्थिक मदत करण्याचा मानस

नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांचे पाच वर्षांचे संपूर्ण मानधन आणि नगरसेवक सागर अरुण निंबोरकर यांचे योगदान; एकूण २० लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी…

 

गडचिरोली, प्रतिनिधी :
आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्याचे शिक्षण अर्धवट राहू नये, या सामाजिक जाणिवेतून गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबोरकर आणि त्यांचे सहचर, नगरसेवक सागर अरुण निंबोरकर यांनी एक अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला आहे. गरजू, पितृछत्र हरपलेल्या व गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तब्बल २० लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्याचा त्यांनी संकल्प जाहीर केला आहे.
नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी आपल्या संपूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळातील मानधनाची सुमारे १२ लाख रुपयांची संपूर्ण रक्कम या समाजोपयोगी कार्यासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच नगरसेवक सागर अरुण निंबोरकर हेही आपल्या स्वखर्चातून आर्थिक योगदान देणार असून, दोघांच्या संयुक्त प्रयत्नातून एकूण २० लाख रुपयांपर्यंतची मदत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे.

 

या उपक्रमाचा लाभ विशेषतः अशा विद्यार्थ्यांना मिळणार आहे, ज्यांनी वडिलांचे छत्र गमावले आहे आणि आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सुरू ठेवणे कठीण झाले आहे. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक ती मदत करून त्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनविण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
याबाबत बोलताना नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबोरकर म्हणाल्या, “शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे आणि उज्ज्वल भविष्य घडविण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे. केवळ आर्थिक अडचणींमुळे एखादा गुणवंत विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणे ही समाजासाठी दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा आम्ही निर्धार केला आहे.
नगरसेवक सागर अरुण निंबोरकर यांनीही या उपक्रमाबाबत भावना व्यक्त करताना सांगितले की, “समाजाने आम्हाला दिलेल्या विश्वासाची आणि प्रेमाची परतफेड करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. शिक्षणात केलेली मदत ही भविष्यातील सक्षम समाजाची गुंतवणूक असते. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना शक्य तेवढा आधार देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू.
शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक व नागरिक संघटनांकडून स्वागत करण्यात येत आहे. अनेकांनी या निर्णयाचे कौतुक करत, इतर लोकप्रतिनिधी आणि समाजातील सक्षम व्यक्तींनीही अशा प्रकारच्या समाजोपयोगी उपक्रमात पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केलेला हा संकल्प केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून, शिक्षणाच्या बळावर सक्षम, सुशिक्षित आणि आत्मनिर्भर समाज घडविण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

एटापल्लीत संतापाचा उद्रेक!‘JSW’ कंपनीविरोधात नक्षल बॅनर; “चले जाओ”च्या घोषणांनी परिसर दणाणला

गडचिरोली तेली मोहल्ला (प्रभाग क्रमांक 09 अ) पोट निवडणूक

भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा तसेच श्री. रविंद्र पाटील वासेकर यांचा जिल्हाध्यक्ष पद दशकपूर्ती सन्मान सोहळा